Saturday, August 9, 2014

करंटेपणाने लादला दुष्काळ

पुढच्यास ठेच मागचा शाहणा या म्हणीचा अर्थ समजून न घेण्याच्या आपल्या वृत्तीने सलग दुसऱ्यांदा अवघा मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जलसंकट परतवण्यासाठी फारसे प्रयत्न न केल्यामुळेच पाण्यासाठी तोंड वेंगाडण्याची वेळ आपल्यावर आली आहे. या संकटाला फक्त राज्यकर्तेच नव्हे तर तुम्ही-आम्हीसुद्धा तितकेच जबाबदार आहोत.
.......
हे नाही...ते नाही असं म्हणत शासनाच्या नावानं खडे फोडण्याची सवयच आपल्याला लागली आहे. खड्डा पडला शासनानेच दुरुस्त करावा, पाऊस नाही झाला शासनानेच नुकसान भरपाई द्यावी अशा सवयींनी आपण पंगू होत आहोत, याची जाणीवही आपल्याला राहिलेली नाही. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या चटक्यांनी भाजून निघाला. गावागावात छावण्या सुरू झाल्या, दुष्काळी कामं सुरू झाली... वगैरे वगैरे. पण, हे संकट का ओढवलं, याचा विचार आपण केलाच नाही. मराठवाड्यातील दोन-पाच शहाणीसुरती गावं सोडली तर इतर बहुसंख्य गावं आज पुन्हा टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. वर ज्या दोन-पाच गावांचा उल्लेख केला, त्या गावांमध्ये जलसंवर्धनाचे प्रयत्न झाल्यामुळे आपले भाऊबंद टंचाईच्या जोखडातून मुक्त झाले. त्यांची कॉपीही वर्षभरात आपल्याला करता आलेली नाही. आता पावसाने डोळे वटारताच आपल्याला विद्वान राज्यकर्त्यांनी दुष्काळ जाहीर करा, असा टाहो सुरू केला. पण, दुष्काळ पडूच नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा प्रयत्न ना या राज्यकर्त्यांनी केला ना तुम्ही-आम्ही.
मराठवाड्यातील आठपैकी एकही जिल्हा पाण्याच्या बाबतीत सर्वार्थानं स्वयंपूर्ण नाही. याचं कारण निश्चयानं जलसंवर्धन न करणं हेच आहे. टंचाईच्या नावानं गळे काढणारे आपण पाणी जपून वापरण्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. जपून वापरणे तर सोडाच पाण्याची साठवण्यातही आपण कमी पडत आहोत. बीड जिल्ह्यातील परळी आणि शिरूर तालुका, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, जालना जिल्ह्याचा काही भाग वगळता कुठेही पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे कितीही पाऊस झाला तरी आपला घसा कोरडाच राहणार, हे निश्चित ! एकदा ठेच लागल्यावर तरी जलसंवर्धनासाठी प्रयत्न करण्याकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळेच यंदाही जलपातळी खालावल्याच्याच बातम्या प्रसिद्ध झाल्या. उस्मानाबाद जिल्हा वगळता इतर सातही जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. ती का ओढवली, याचे कारण आपल्याला माहित असूनही आपण त्याकडे पाठ करून उभे आहोत.  ही अनास्थाच आपल्याला मारक ठरणार आहे. जायकवाडी धरणात वर्षभर पिण्यास पुरेस इतके पाणी साठले, की आपण हुश्श करतो. मात्र, ज्या शेतकऱ्यांसाठी हे धरण बांधले होते, त्यांना पाणी मिळेल की नाही, याची चिंता आपण करतच नाही. माझं पोट भरलं की झालं ही वृत्ती अंगी बाणवल्यामुळे आपण इतके स्वार्थी झालो आहोत, की त्यासाठी ढोंग करायलाही आपण मागेपुढे पहात नाही. आपल्या भागात पाऊस झाला नाही, की वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडावं यासाठी आंदोलनं सुरू होतात. हक्काचं पाणी या गोंडस नावाखाली ऊर फुटेस्तोर आंदोलन करणारी ही मंडळी जलसंवर्धनासाठी मात्र पुढे येत नाहीत. अर्थात दोष फक्त त्यांचा नाहीच, आपणही तितकेच दोषी आहोत. पाणी साठवण्याकडे केलेले दुर्लक्ष आपल्या विनाशाकडे घेऊन जात आहे आणि आपण मात्र हक्काच्या पाण्याचे रडगाणे गात आहोत.
दै. दिव्य मराठीच्या मुख्य अंकात २९ जुलै २०१४ रोजी एक विशेष पान प्रकाशित झालं. या पानामध्ये जालना जिल्ह्यातील शिवनी या गावातील शेतकऱ्यांनी महत्तप्रयासानं केलेल्या जलसंवर्धनाची कहाणी प्रकाशित झाली. बीड जिल्ह्यातील लोळदगाव आणि उदंडवडगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सांगवी बोरगावचे शेतकरी माधवराव गुंडूरे अशी चार-दोन उदाहरणं सोडली, तर टंचाईवर मात करण्यात शेतकरीही मागेच असल्याचे स्पष्ट होतं. मारहाण, अत्याचार असे प्रकार घडले की, न्यायाची मागणी लावून धरत सत्याग्रह करणाऱ्या समाजिक संघटनाही जलसंवर्धनाच्या लढ्यापासून दूरच आहेत. शासन आणि यंत्रणेबद्दल तर न बोललेच बरं, अशी परिस्थिती आहे. थोडक्यात काय, तर पावसाळा संपण्यास आणखी किमान महिना पंधरा दिवस शिल्लक आहेत, या काळात काही हालचाल केली तर भविष्यात टंचाईवर मात करणं शक्य होईल. त्या पुढील काळात उपलब्ध जलसाठा योग्य पद्धतीनं वापरण्याचा नियोजनही करता येईल. असे प्रयत्न झाले तरच पुढचे वर्ष तुमच्या माझ्या आयाबहिणींना पाण्यासाठी रानोमाळ हिंडावं लागणार नाही. अन्यथा आपल्याच करंटेपणानं पुन्हा दुष्काळ आपल्या मानगुटीवर बसेल.

Sunday, August 3, 2014

यवतमाळ शहरातील 78 वर्षांच्या तरुणाची यशोगाथा

 हातकागदाच्या वेडातून सुरू झाला प्रवास, जागतिक स्तरावर कार्याचे कौतूक 40 वर्षांच्या मेहनतीने बनले लष्कराचे एकमेव पुरवठादार
70 च्या दशकात केमिकल इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतरही गलेलठ्ठ पगाराची नोकरी लाथाडून एक तरुण परंपरात व्यवसायात रमला. या ध्येयवेड्याने 40 वर्षात स्वत:चा मूळ व्यवसाय भरभराटीला आणतानाच हातकागदाच्या क्षेत्रात ग्लोबल भरारी घेतली. यानंतरही तिथेच अडकून न पडता थेट लष्कराला विशिष्ट प्रकारच्या पुठ्ठ्यांचा पुरवठा करण्याचा प्रकल्प उभारून विदर्भातील एकमेव पुरवठादार होण्याचा मान मिळवला. ‘आंत्रप्रिनर’ हा शब्द रक्तात भिनलेल्या आणि व्यावासायिकाची कामात झोकून देण्याची वृत्ती आयुष्यभर अंगी बाणवणा ऱ्या त्या उद्योजकाचे नाव आहे, ओमप्रकाशजी अग्रवाल.1947 मध्ये जन्मलेल्या ओमप्रकाशजी यांनी केमिकल इंजिनियरींग पूर्ण केल्यानंतर मुंबई आणि नागपूरातील काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले. मात्र, परंपरागत व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांनी या नोकरीकडे पाठ फिरवली. 100 वर्षांपासून सुरू असलेल्या स्टेशनरीच्या व्यवसायात बदलत्या काळानुसार अनेक बदल केले. पुरवठादारांवर अवलंबून न राहता विविध प्रकारचे कागद तयार करण्याचा चंग बांधलेल्या ओमप्रकाशजींनी हातकागद बनवण्यावर लक्ष केंद्रीत केले. नवरंग पेपर्स नावाने 1979 मधे छोट्याशा जागेत हातकागद तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. सुरुवातीच्या काही प्रयोगात अपयश आल्यानंतर या व्यवसायाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी 1982 मध्ये पुण्यातील हातकागद कारखाना गाठला. हे प्रशिक्षण आणि केमिकल इंजिनिअरींगची पदवी या शिदोरीवर असंख्य प्रकारचे हँडमेड पेपर तयार करण्यास सुरुवात केली. इतर व्यवसायिकांप्रमाणे परंपरागत पद्धतींचा वापर न करता सेमिआॅटोमॅटिक मशीन्स वापरून अनेक अभिनव प्रयोग केले
.....

ओमप्रकाशजी अग्रवाल
कागदांचे मनोहरी विश्व
आजवर कुणीही न वापरलेले 50 विविध प्रकारचे फायबर वापरून हातकागद तयार करण्याचा प्रयत्न करताना बांबू, केळीचा बुंधा, जिरे, निवडूंग, तुळस,गवती चहा, इंग्रजी चिंच, केतकी आदींचे हातकागद तयार केले. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 40 कामगारांपा प्रशिक्षण दिले. 1982 पासून ते 90 च्या दशकापर्यंत देशातील प्रत्येक कोपऱ्यात नवरंग पेपर पोहोचवला. सुगंधी हातकागद बनवणारे ते देशातील एकमेव व्यावसायिक ठरले. त्या काळातील सुप्रसिद्ध कार्यक्रम सुरभीने या अभिनव उपक्रमाची नोंद घेतली. सिद्धार्थ काक यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर ओमप्रकाशी अग्रवाल हे नाव देशभरात पोहोचले. यानंतर केवळ हातकागद तयार न करता या कागदापासून ग्रिटींग्स, डायरी, लेटरपॅड्स बनवण्यावर अग्रवाल यांनी लक्ष केंद्रीत केले. राष्ट्रपती भवनातील विविध कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या निमंत्रणपत्रिका, देशोदेशीच्या वकिलातीतील अधिकाऱ्यांना पाठवयाची पत्रे आदींसाठी कागदही अग्रवाल यांनी पुरवला. विशेष म्हणजे, पंतप्रधान कार्यालयासाठी असे साहित्य बनवण्याकरिता देशभरातून नमुने मागणवण्यात आले होते. त्या वेळी इंदिरा गांधी यांनीही अग्रवाल यांनी तयार केलेल्या हातकागदाची निवड केली.
....
जागतिक बहुमान
आपल्या क्षेत्रातील इतर व्यावसायिकांना कमी न लेखता त्यांचे प्रयोग जाणून घेण्यासाठी 80 च्या दशकापासूनच देशपातळीवरील आणि आंतरराष्ट्रीय कागद परिषदा आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला. मुंबई, कलकत्ता आणि दिल्लीतील प्रदर्शनांमध्ये अनेक पुरस्कार पटकावले. फ्रंकफट येथे होणाऱ्या जागतिक दर्जाच्या वर्ल्ड आॅफ पेपर या प्रदर्शनात 2006,07 आणि 08 अशी सलग तीन वर्ष विजेत्याचा बहुमानही मिळवला. देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तब्बल 15 बक्षीसे त्यांनी पटकावली.
.....
लष्काराची कौतुकाची थाप
वाढता उत्पादन खर्च, कागदाची वाढती किंमत या चिंतांनी त्रासलेल्या ओमप्रकाशजी यांनी 1990 पासून इतर व्यवसायांचा शोध घेण्यास सुरुवात केली. लष्काराला बोफोर्स तोफांसाठी लागणाऱ्या सीडी कप, बॉम्ब डिस्क, आणि विशिष्ट प्लेट्स आयात कराव्या लागत. त्या तयार करण्याचा चंग ओमप्रकाशजी यांनी बांधला. यातूनच लष्कराचे पुरवठादार होण्याचा निर्णय घेत असे साहित्य बनणारे विदर्भातील एकमेव व्यावासयिक बनण्याचा निर्धार केला. तो पूर्ण करण्यासाठी पुन्हा जोमाने तयारी केली. लष्कराच्या  चंद्रपूर, भंडारा, पुणे, जबलपूर, भुसावळ, उटी आदी ठिकाणावरील कारखान्यांना ते असे साहित्य पुरवतात.
......
आणि कलामांची भेट झाली
20 सप्टेंबर 2004 रोजी चेन्नईतील डॉ. चेरिअन यांच्या रुग्णालयात अग्रवाल यांची बायपास शस्त्रक्रिया झाली. चेरिअन यांच्या स्टेम सेल लॅबच्या उद्घाटनासाठी दोनच दिवसांत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम तिथे येणार होते. हे कळताच अग्रवाल यांनी त्यांची भेट घेण्याचा निश्चय केला. कलाम यांना भेट देण्यासाठी इंप्रेशन पद्धतीने तयार केलेले कलाम यांचे वडिल जैनलाबुदिन अब्दुल यांचे पोट्रेट तयार केले. मात्र, ऐनवेळी, अग्रवाल यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ही भेट टळली. मात्र, 2006 मध्ये पुन्हा भेटीचा योग जुळून आला. हातकागद आणि लष्काराला पुरवलेल्या साहित्यबाबत कलाम यांनी अग्रवाल यांचे कौतूक करून कामाची पूर्ण माहिती घेण्यासाठी अर्धा तास वेळही दिला.