पाच धा सालाआदी पहाटं झाली सगळ्यासनी गुरं चरायला सोडायची घाई
व्हायाची. राती उशिरा दमून निजलेली कुणी अनसुया, रखमा किंवा लक्ष्मी घरधनी उठलेला पाहून
आपुनबी कामाला लागायची. हगरी चांदनी उगवली की अाताबी गाव जागा होतो. पर, कामाच्या घाईन
नव्हं तर कुणाच्या तरी जाण्याची बोंब उठल्यानं. कलागत व्हावी, चोरी व्हावी असं कुणाच्या
कुडात काही राहल्यालं न्हाई. चार सालाआधी दुष्काळ पडला तिथंच पुंजीची राख झाली आता
अंगाला फासायला तीबी उरली न्हाई. आता बोंब उठती ती कुणाच्या न कुणाच्या फाशी घेण्यानं
किंवा पिकावर फवारायचं औषिध प्याल्यानं. हप्त्यात एकतरी मानूस जानार अन् गावात कालवा
उठणारं हे समद्यासनी तोंडपाठ झालयं. दिस उगवताच पारावर माणसं गोळा व्हत्यात, कशानं
गेला वो रामा असं कुणीस बोललचं तर मानसं खुळ्यागत त्याच्याच तोंडाकडं पाहत्यात.
आज
कुंभाराच्या गल्लीत तर उद्या मांगाच्या वस्तीत रोज कुठं न कुठं रडारड अन् कालवा. तासा
दोन तासांत पंचनामा झाला की पै पाहुने पसार हुत्यात. कच्च्याबच्च्यांसाठी कुणी पदरं
पसरलाच तर त्यात काय टाकायचं या ईचारानं त्यांचही तोंड काळठिक्कर पडतं. आठ दिवसांतच
हा ईषय जुना होतो अन्् गाव पुन्हा जगायला लागतं. बापं फाशी घेऊन मेला तरी जगनं थांबत
न्हाई… आय तर
जिती हाय ना म्हनत पाेरं चार बुकं जमवत शाळत येतात. पर तिथबी समदे बिचारा म्हनूनच पाहतात
म्हनल्यावर पोरांचाही धीर सुटतो अन् शाळाही. पुढं गावात गावलंच काम तर ठिक न्हाय तर
धाबे, हॉटेलात पाेरं लागतातच. तिथं कुनीच कुनाचं न्हाई. दिसभर राबलं की पाेटाला मिळतच
वर पैसंही मिळतात. घरी लग्नाची बहीन अडल्याली, तिच्याकडं बघु का माझं पोट भरू या ईचारात
एक रोजी ती बी आड जवळ करती अन् तोही प्रश्न सुटतो. कारण मानूस गेला तरी जगनं संपत न्हाई….
दोन-तीन सालापासून गावागावात अशीच पारशा तोंडानं सकाळ व्हती अन्
दमल्या अंगानं सांज. जे पदरी पडलं ते घिऊन घर गाठायचं अन् पोरांच्या तोंडात घास टाकण्याची
तजवीज करायची. न्हाईच गावलं काई काम तर चोरी करायलाही म्हाग पुड न्हाय बगायचं. औंदा
पुन्हा दुश्काळ पडला राव, असलं बोलनही कानावर येत न्हाई. हेच आपलं जगनं समजून जो तो
कामाला लागतो. गावातल्या आयाबाया तर जगनं विसरल्यात. पुनव आली काय अन् चांद उगिवला
काय रोजचीच एकादशी. सांज झाली की वाटेकडं डोळं लागत्यात. पोरांचा बाप येताे का बातमी
या ईचारानं चूल शांत झाली हेबी ध्यानातं येत न्हाई. पोरं भूक भूक करायला लागली तरी
माय जागची हालत न्हाई. दारात चपलांचा ओळखीचा आवाज झाला की मरणं पुढं ढकलल्याच्या आनंदात
चुलीतला जाळ पुन्यांदा मोठा व्हतो. पाेरगी उजवायची चिंता, रानातल्या पिकाची काळजी,
पोरांच्या शाळंची फी या चक्रात अडकलेला बाप दो घास चावतो अन् चतकोर भाकरं लक्ष्मीपुढं
ठिवतो. सकाळच्या न्ह्याहारीला कामी येईल म्हनतं माय तांब्याभर पानी पिते अन् दिस संपतो.
औंदा हळद लागणार या ईचारानं पोरींना आभाळ ठेंगनं होन्याचे दिवस कवाच पांगले. गतसालात
गेटकेन तरी व्हायाचं आता ऊसच न्हाई… मग फड
कुठला अन् लगीन कुठलं…. आदी पाटलाच्या पोरीच्या लग्नात
मिरवायला जाणाऱ्या पोरी आत घराभाहेरबी पडत न्हाईत. माय म्हनाली व्हती, पोरी पत न्हाय
राहिली अब्रु तरी जप, हे आठवत लहानग्या भावंडांची माय होतं या पोरी विस्कटलेल्या मनानं
त्यांनाच जीव लावत्यात. मारूतीच्या मंदिरात आता कुनी भजनही म्हनत न्हाई… दिवा
लागत न्हाई की अडकित्याचे आवाजही कानी पडत न्हाईत… देवाकडं
मागून पाह्यलं, सरकारला विनवून झालं झोळी रिकामीच हाये म्हनल्यावर कुनब्यांनी पन रोहयो
जवळ केली. स्वत:च्या रानात राबणारे हात तलाव खोदू लागले. रोपवाटिकेचं काम असो की गाळ
काढायचं यादीत सगळ्यांचीच नावं. आधी नाव ऐकताच नाव मुरडणारे शिस्तीत कामाला लागतात.
इकडं ट्रंकेतल्या पातळावर हात फिरवत आता बाया जुन्या काळाच्या आठवांनी कासावीस व्हत्यात.
पोरांस्नी सांगताना हुशारत्यात, हे लुगडं बघ तुझ्या बा नं घेतलं हुतं… काठावरची
नक्शी पाह्यली का… पातळाचा जरीकाठ कधीच विरला… पन त्या
दिसांची सय मनात दाटली की डोळ्यांपुढं गोकुळ उभं राहतं… दावणीची
दुभती गाय आठविती… गुराख्याला भाकर देताना दिलेली
गुरं सांभाळण्याची ताकीद आठवती अन् घरधन्याचा चेहरा दिसताच डोळ्यांसमोर येतो फाशीचा
दोरं… पंचनाम्यावर
उमटवलेली बोटं…. अन् काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा… आता कशापायी
रडायचं मानूस गेला… ओझं तसचं राह्यलं. दहावा व्हायच्या
आत आडत्याच्या मानसानं कणगीतून धन उपसून नेलं. बिया, खताचं पैसं देण्यात डोरलं कामी
आलं. महिना झाला तसा तलाठ्यानं नाव पुकारलं. आत्महत्त्या नियमात बसत न्हाई म्हनाला
अन् पोरीकडं बघतं कुजकट हसला. तवा पोरींच्या काळजीनं काळीज चरखलं. पोरं कोल्या कुत्र्यांची
धन होऊ नये या भीतीनं रातभर माय जागीच असते. कधी कुन्या मानसाची घरावर नजर पडू दिली
न्हाई. पोरांचा बाप असता तर एकेकाला काढण्या लावल्या असत्या. पर आता, ना त्यांचा बाप
राहिला न जिणं. नशिबाचे भोग म्हनतं दिस ढकलायचा. आता जत्रापनं आधीसारखी रंगत न्हाई.
पिपाणीत फुंकायला जोरच राह्यला न्हाई तर मंजूळ आवाज तरी कुठून येणार. जत्रेत हिंडणारी
पोरं शेवचिवड्याच्या थाळ्याकडं बघतच राहत्यात. कुनी तात्या, आबा हाक मारून शिळ्या जिलबीचं
तुकडं फुंड करत्यात तवा झोंबाझोंबीत कागुदच हातात राहतो. धुळीत पडलेलं तुकडं पन गोड
लागत्यात ही म्हनही पोरांस्नी आता समजली हाये. शाळला सुटी लागली की या पोरांच्या पोटात
आग पडते. खिचडीसाठी शाळेत येनारी पोरं मास्तरांच्या दारांत रेंगाळतात. गुळ-खोबरं खात
बसलेले मास्तरही पोरांना जागतिक मंदीवर भाषण देत चार शेंगा अंगावर फेकतात. असलं कुत्र्यागत
जिणं आपल्याच वाट्याला का आलं याचा ईचार करत ही पोरं सांज झाली की घर गाठतात अन् दिस
संपतो. हां, बाजारादिवशी मात्र गाव फुशारतो. कुनाची गाय, कुनाची घागर कुनाची घुंगुरमाळ
बाजारात येते अन् आठ दिवसांची चिंता दूर व्हते.
कधीतरी दुष्काळ मदतीची यादी लागल्याची
हूल उठते अन् गावात धांदल सुरू व्हते. वरच्या माळावर टाकून दिलेल्या खिळ्याला लावलेली
कागदं धुंदाळत मानसं सातबारा घिऊन बँक गाठत्यात. तिथं वाण्या-उदम्यांचे गडी आधीच हुभे
असत्यात. ‘किसन बाबाराव गुरव सोळाशे पंधरा रुपे’ असा पुकारा होताच १० एकरांचा मालक
अंगठा उमटवायला पुड व्हतो. पैसं हातात पडतात न पडतात तोच हे गडी आपली यादी काढतात,
अजून निम्मे राह्यलेत म्हनत चळत काढून घेत्यात. अन् उदास मनानं तो घर जवळ करतो. कदी
हे समदचं नको नको वाटतं. वाढत्या पोरींच्या काळजीनं जीव नकोसा व्हतो. रानात कशायला
जायाचं असं वाटत असतानाच कुन्या सोसायटीचा शिपाई नोटीस घिऊन समोर हुबा राहतो. तोंडावर
मारायला पैसा नसताना त्याच्या हातातला कागूद पाहून बापाचे भेगाळलेले पाय मटकत वाकतात.
याच तगमगीत तो रानात येतो अन् आखाड्यावर बांधलेली बैलजोडी विकावी का, या ईचारानं थबकतो.
पोटच्या पोरावानी जपलेल्या या बैलजोडीला बाजार दाखवाच्या कल्पनेनं त्याला कापरं भरतं.
शेवटी त्याच्या बापानं लावलेल्या लिंबाच्या झाडालाच फास घेऊन तो मोकळा व्हतो अन् गाव
अंत्ययात्रेच्या तयारीला लागतो. थोड्याफार फरकानं हरएक गावात हेच चाललयं. शेवटचे उसासे
टाकत गाव एकेक दिस मागं ढकलतोय. पिक गेलं… मानसं
गेली… अन् सुखही
…. गावांत
आता उरलंय तरी काय भेगाळलेली माणसं अन् जगणं खरवडून टाकणारा दुष्काळ !
one of the best blog post, I have seen you are really good. I will recommend your website to my all friends.
ReplyDeleteThank you for helping
English Speaking Course In Noida
हृदयस्पर्शी वर्णन
ReplyDelete