.................................................
तुम्ही फँड्री पाहिलाय? मराठवाडी भाषेची ओळख करून घ्यायची असेल, तर त्यासाठी फँड्री पाहायलाच हवा. फँड्रीची कथा घडते त्या भागातील थोडंसं उस्मानाबादी पद्धतीचं वागणं-बोलणं आणि शब्दांनी हा चित्रपट नटला आहे. प्रत्येकाला ही आपलीच कथा वाटावी, इतकं जवळचं नातं फँड्री अवघ्या काही क्षणांत निर्माण करतो. अगदी प्रमाण मराठी बोलणाऱ्यालाही ‘चल की रं लेका’ असं म्हणण्याचा मोह व्हावा इतका आपलेपणा फँड्री पाहून वाटतो. मराठवाडी बोलीनं सजलेला हा काही पहिला चित्रपट नाही. मकरंद अनासपुरे या हरहुन्नरी कलाकारानं विनोदी ढंगात अभिनय सादर करून मराठवाडी बोलीला चित्रपटांमध्ये स्थान मिळवून दिलं. अशा या मराठवाडी बोलीतील १० हजार शब्दांचा संग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. परशुराम गिमेकर आणि सहायक संशोधक डॉ. निशिगंधा व्यवहारे यांनी नुकताच पूर्ण केला.
प्रा. डॉ. परशुराम गिमेकर |
विस्मृतीत गेलेल्या शब्दांची नोंद : शहरी भागातील लोकवस्तीचे प्रमाण वाढले तसे भाषेचे प्रमाणीकरणही मोठ्या प्रमाणात होत गेले. आपण गावंढळ ठरू, या भीतीने साहजिकच अधिकाधिक शुद्ध बोलण्याकडे प्रत्येकाचा कल वाढला. मात्र, त्यामुळे अनेक जुने शब्द विस्मृतीत गेले. अर्धी उबार (अर्धे आयुष्य), अस्तेर (अर्धा शेर), आडकूल (पोहे), आडसन (निवडलेले धान्य), आभरान (रंगीबेरंगी कपड्याच्या तुकड्यांनी तयार केलेला पोतराजाचा घागरा), आशीलदान (खंडणी), इरजिक (सहकार्याच्या भावनेतून केलेली शेतीतील कामे), कबाडा (भानगड), चट (सवय), खडीचोट (स्पष्ट बोलणे), गादा (वाफा), चिभडरान (पाणी साचलेले शेत), तोडा (बंदूक), ननगा (लहान, नेणता), नयकल (चड्डी, अर्धी विजार) अशा अनेक शब्दांची या दोन संशोधकांनी आवर्जून नोंद घेतली.
लोककथांचाही शोध : मराठवाडा बरीच वर्षे निझामशाहीच्या अधिपत्याखाली राहिल्याने मराठवाडी भाषेवर उर्दू-फारशी शब्दांचाही प्रभाव पडलेला दिसून येतो. मराठी भाषेत रुजलेले काही उर्दू-फारशी शब्द मराठवाडी बोलीतही वापरले जातात. उदा. अवलाद, आमदानी, आमीन, इज्जत, इशारा, जिगर, कसूर, खुर्दा, फारकत, बिलामत, रोषणाई, हिकमती. अशा शब्दांचा शोध घेतानाच प्रा.डॉ. गिमेकर आणि डॉ. व्यवहारे यांनी मराठवाड्याच्या प्रत्येक भागातील लोककथा, लोकगीते, जात्यावरच्या ओव्या, गाणी आणि लोकसमजुतींचाही संग्रह केला आहे. हेच या संशोधनाचे वेगळेपण ठरते.
![]() |
डॉ. निशिगंधा व्यवहारे |
अनोखे वाक्प्रचार अन् म्हणी : अस्सल मराठवाडी बोलीतील वाक्प्रचारही या संशोधकांनी अतिशय कष्टांनी जमा केले आहे. अडक्याची काडी, लाखाची जाळी माडी (छोट्याशा चुकीमुळे मोठे नुकसान होणे); ऊनपाण्याने घर जाळणे (खोटे आरोप करणे); करडीच्या अक्षता पाठवणे (अपमानित करणे) अशा ८०० पेक्षा जास्त वाक्प्रचार आणि म्हणींनी हा संग्रह सजला आहे. प्रा. डॉ. गिमेकर सांगतात, आमचे संशोधन हे काही अंतिम नाही. त्यामुळे यापुढेही हे काम सुरूच राहणार आहे.
.....
सर्वेक्षणाची पद्धत अशी : या उपक्रमाविषयी प्रा. डॉ. गिमेकर सांगतात, कामास सुरुवात केल्यानंतर फक्त शासकीय चौकटीत बसणारा शोधप्रकल्प तयार न करता मराठवाडी बोलीला जपण्याचा मनापासून प्रयत्न केला. केवळ शब्द, म्हणी, वाक्प्रचारच नव्हे, तर लोकगीत, ओव्या, गाणी अशा ठेव्यांसह दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा चौफेर विचार करत त्यांची नोंद घेतली.
कामासाठी ही पद्धत अवलंबली :
- सर्वप्रथम नागरिकांचा वयोगट निश्चित केला. 68-80 या वयोगटातील स्त्री-पुरुष केंद्रस्थानी ठेवत सर्वेक्षण केले.
- शहरी संस्कृतीचा प्रभाव नसणाऱ्या अतिदुर्गम भागांची निवड केली. या भागात सर्वेक्षण करून नोंदी घेतल्या.
- जिव्हाळ्याच्या विषयांवर नागरिकांना बोलते केले. गावातील रूढी, धर्म, सण-उत्सव, रोजगार आदी विषयांवर चर्चा केली.
- सर्वेक्षणासाठी स्थानिक प्राध्यापक, विद्यार्थ्यांची मदत घेतली.
- यानंतर शहरांजवळ वसलेल्या गावांमधील नागरिकांशी संवाद साधला.
- सर्वेक्षण करताना विशेषत: राज्याच्या सीमेवरील भागावर लक्ष केंद्रित केले. सीमावर्ती भागातील नागरिकांच्या बोलीभाषेवर साहजिक इतर भाषांचा प्रभाव असतो. वऱ्हाडी, अहिराणी, नगरी, तेलगू, कानडी आदी भाषांतील अनेक शब्द मराठवाडीतही रुजले आहेत, त्याचीही नोंद सर्वेक्षणादरम्यान केली.
- मराठवाडी प्रदेशात राहणाऱ्या पण मातृभाषा निराळी असणाऱ्या जातीसमूहांचाही सर्वेक्षण करताना प्राधान्याने विचार केला. बंजारा, कैकाडी, घिसाडी, गोपाळ, वैदू, पारधी, वडार आदी समाज तसेच भिल्ल, गोंड, कोलाम या आदिवासी बांधवांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. हे नागरिक परस्परांशी मातृभाषेतच बोलत असले, तरी इतर नागरिकांशी मराठीतच संवाद साधतात. त्यामुळे साहजिकच दोन्ही भाषांतील शब्दांची सरमिसळ होते. त्याचीही नोंद संशोधकांनी केली.
No comments:
Post a Comment