Tuesday, September 16, 2014

चला वाचवू पश्चिम घाट

पश्चिम घाटातील जैवविविधता टिकून राहावी, यासाठी अनेक भाषांतील वृत्तपत्रांसह  टीव्ही, रेडिओच्या माध्यमातूनही जनजागृती होत आहे. पश्चिम घाट वाचवणे अत्यावश्यक असून त्यासाठी योजावयाच्या उपायांच्या तसेच नेमलेल्या समित्यांसह गुंडाळलेल्या अहवालांबाबतही सातत्याने बातम्या येतात. मात्र, पश्चिम घाटाचे नेमके स्वरूप, तेथील जैवविविधता वाचवणे का आवश्यक आहे, याबाबत नव्या पिढीला परिपूर्ण माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ते स्वरूप समजल्याशिवाज तुमची माझी पिढी हा घाट वाचवण्याबाबत सजग होणार नाही. अर्थात नेटसॅव्ही मंडळी निरनिराळ्या माध्यमांतून पश्चिम घाटांबाबत माहिती देत आहेत. मात्र, ती एकाच ठिकाणी संकलीत केलेली नसल्यामुळे तुकड्यातुकड्यांतून मिळणारी माहिती अपुरी ठरत आहे.
मागच्या रविवारी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजीच्या मराठी वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमधून हा विषय पुन्हा चर्चिला गेला. नििमत्त होते केंद्रातील आघाडी शासनाप्रमाणेच मोदी सरकारमधील पर्यावरण व वनखात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेल्या निर्णयांचे. दै. दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीमध्ये अभिलाष खांडेकर यांनी म्हटले होते, जावडेकरांच्या खात्याने माधव गाडगीळ समिती व कस्तुरीरंगन समिती या दोन्ही अहवालांना बासनात गुंडाळून टाकले आहे. डॉ. मनमोहनसिंग सरकारने जसे संबंिधत सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्व देऊ केले होते व पश्चिम घाटात खाणकाम, िनर्माण व अन्य ‘विकासकामे’ सुरू ठेवण्याची बंधने सैल केली होती, त्याच मार्गावर मोदी सरकारसुद्धा, आता अिधक वेगाने मार्गक्रमण करत असल्याचे भयावह िचत्र समोर येत आहे. सहा दक्षिण-पश्चिम राज्यांना, अर्थात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा व गुजरात-महाराष्ट्र यांना स्वत:ची अशी नवी पाहणी करण्याची मुभा आधी वीरप्पा मोईली यांनी २०१३मध्ये िदली होती, ती आता जावडेकरांनी कायम ठेवली आहे. ही निश्चितच खेदजनक बाब आहे. याचमुळे जवळजवळ १६०० िक.मी.चा पश्चिम घाट पुन्हा एकदा खदखदतोय, न्याय मागतोय...
हा लेख वाचल्यानंतर पश्चिम घाट नेमका आहे, तरी कसा हे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे मी गुुगलवर काही वेळ शोध घेतला. त्यात विकिपीडियापासून फेसबुकपर्यंत विविध ठिकाणी या विषयावरील मजकूर मिळाला. देशभरासह जगभरातील मराठी वाचकांना हा मजकूर एकाच ठिकाणी देता आला तर.... अशी कल्पना सुचल्यामुळे मी शक्य तो मजकूर आणि संबंधित पानांच्या लिंक्स या लेखासोबत देत आहे. हा लेख वाचणाऱ्या मित्रांना एकच विनंती आहे, की पश्चिम घाटाविषयी आणखी सकस लेखन किंवा उपक्रमांची माहिती असेेल तर ती माहिती आवर्जून शेअर करावी.
...........
०१ ) विकिपीडियामध्ये म्हटले आहे, सह्याद्री पर्वतरांग किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम तटाशेजारी उभी आहे. ही रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी चालू होते आणि अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाच्या जवळ पोचते. या पर्वतरांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.[१] या पर्वतरांगेचे क्षेत्रफळ ६०,००० वर्ग कि.मी. असून या पर्वतरांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे [२]. अनेक उंच शिखरे ही पर्वतरांग सामावून घेते, त्यामध्ये रांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी), महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मी). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. पर्वतरांगेत महत्त्वाचा खंडभाग पलक्कड खिंडीच्या स्वरुपात आहे जी तमिळनाडू आणि केरळ यांना जोडते. इथे सह्याद्रीची सर्वात कमी उंची आहे (३०० मी). पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक आहे. इथे ५००० पेक्षा जास्त फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती, १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.[३]
पश्चिम घाट ही पर्वतरांग नसून दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५० दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यांमुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या तुकड्याची पश्चिमेकडची बाजू साधारण १००० मी. उंचीचा कडा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते [४].
गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जिथे येऊन मिळाली, तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बसाल्ट खडक असे म्हणतात. त्याखालील खडक हे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेले जुने खडक आहेत व ते निलगिरीच्या काही भागांमध्ये सापडतात..[५]
बेसाल्ट खडक हा सह्याद्री पर्वतरांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट खडक दक्षिणेकडील पर्वतरांगांमध्ये आढळतात.[६]
पर्वतशिखरे
सह्याद्री पर्वतरांग उत्तरेला सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होते. नंतर दक्षिणेला गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तमिळनाडू राज्यामध्ये पसरलेली आहे. यातील मुख्य रांग म्हणजे सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुख व कोडागु इत्यादी थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. निलगिरी पर्वतरांग, बिलिगिरीरंगन पर्वतरांग, सेर्वरायन पर्वतरांग आणि तिरुमला पर्वतरांग इत्यादी काही छोट्या पर्वतरांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात.
कळसुबाई शिखर
काही छोट्या पर्वतरांगा उदा. कार्डमम पर्वतरांग व निलगिरी पर्वतरांग या तमिळनाडू राज्याच्या उत्तर-पश्चिम क्षेत्रात आहेत. निलगिरी पर्वतरांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या पर्वतरांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई पर्वतरांगे मध्ये अनाई मुदी (२,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासूर शिखर (२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी पर्वतशिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. गोवा खिंड जी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मध्ये आहे व दुसरी पलक्कड खिंड जी निलगिरी व अनामलाई पर्वतरांगांच्या मध्ये आहे.
निलगिरी पर्वतरांग
पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार किंवा मलबार किनारा असे म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्रात देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात.
पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाउस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्या स्वरुपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा जास्त पाउस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या इथेच उगम पावतात.
नद्या व धबधबे
जोग धबधबा (कर्नाटक) हा भारतातील एक प्रेक्षणीय धबधबा आहे.
पश्चिम घाट हा अनेक लहान मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. या पैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा व कावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच इतर अनेक नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यापैकी मुख्य नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी. इतर अनेक नद्या या पश्चिम घाटात उगम पावतात. छोट्य नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी, इ. प्रमुख नद्या आहेत.
अनेक पश्चिमवाहिनी नद्या ह्या खूप उतारावरून वाहत असल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी खूप उपयुक्त आहेत. पश्चिम घाटात जवळजवळ ५० धरणे बांधलेली आहेत व त्यापैकी सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे १९०० साली बांधला गेला.[७] या सर्व धरणांपैकी मोठी धरणे म्हणजे महाराष्ट्रातील कोयना धरण, केरळमधील परांबीकुलम धरण व कर्नाटकातील लिंगणमक्की धरण.
पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविण्यास कारणीभूत घटक म्हणजे धबधबे. पश्चिम घाटात अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. उदा. जोग धबधबा, कुंचीकल धबधबा, शिवसमुद्रम धबधबा व उंचाल्ली धबधबा. जोग धबधबा हा दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे व तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.[८] तळकावेरी वन्यजीव अभयारण्य हे कावेरी नदीच्या उगमाजवळ असलेले एक मोठे अभयारण्य आहे. तसेच घनदाट जंगलांमुळे तुंगभद्रा नदीच्या उगमापाशी शरावती व सोमेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत. हवामान
पश्चिम घाटातील वार्षिक पर्जन्यमान
पश्चिम घाटातील वातावरण हे उंचीनुसार बदलत जाते. कमी उंचीवर उष्ण व दमट हवामान असून जास्त उंचीवर (१५०० मी च्या वर) सरासरी १५ °से. तापमान असते. काही अति उंचीच्या भागांमध्ये कायम धुके असते व हिवाळ्यात तापमान ४-५ °से. पर्यंत खाली येते. पश्विम घाटातील सरासरी तापमान उत्तरेला २० °से व दक्षिणेला २४ °से आहे.[५]
पश्चिम घाटातील सरासरी पर्जन्यमान हे ३०००-४००० मी.मी. (कोकणात) व १००० मी.मी. (देशावर). पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला खूप पाऊस पडतो पण थोडेच दिवस पडतो तर विषुववृत्ताच्या जवळ असणाऱ्या प्रदेशांमध्ये थोडाच पाऊस पडतो पण वर्षभर पडतो.[५]
विकिपीडियावरील पूर्ण लेख पाहण्यासाठी http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80 लिंक वापरा.
.......................................................................................................
याच विषयावरील महत्वपूर्ण माहिती पुढील लिंक्सवर उपलब्ध आहे.
०१ ) http://marathivishwakosh.in/khandas/khand18/index.php?option=com_content&view=article&id=10312
०२ ) https://www.facebook.com/saveghatsmovement
०३ ) http://zeenews.india.com/marathi/news/exclusive/beauty-of-western-ghats/160347
०४) http://www.andolan-napm.in/content/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF
०५ ) http://www.marathimati.net/tag/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F/
०६ ) http://www.bharat4india.com/top-news/2012-11-21-11-17-01/30
०७ ) http://www.lokprabha.com/20120608/matitartha.htm
०८ ) http://www.loksatta.com/desh-videsh-news/environment-ministry-accepts-kasturirangan-report-on-western-ghats-unfortunate-dr-madhav-gadgil-228988/
०९ ) http://amrutmanthan.wordpress.com/
१० ) http://dainiksagar.com/node/53